बार्शी – बार्शी तहसील कार्यालयात सुरु असलेल्या अर्धन्यायिक कामकाजादरम्यान अधिकाऱ्यांना धमकीवजा भाषा वापरुन शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी सोमनाथ गिरी (रा. घाणेगाव) यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे. तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक महावीर अंकुश माळी यांनी दि. १ ऑक्टोबर रोजी याबाबत जबाब नोंदविला आहे.
३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय बार्शी येथे उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र. १, सोलापूर सदाशिव पडदुणे यांच्या अध्यक्षतेखाली अर्धन्यायिक कामकाज सुरु होते. या दिवशी रेडी व अनरेडी
बोर्डवर एकूण १०३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. या प्रकरणात प्रतिवादीच्यावतीने उपस्थित व्यक्तीने अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत आक्षेप घेत जोरजोराने आरडाओरड केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. व्यक्तीच्या वर्तनामुळे अर्धन्यायिक कामकाजात अंदाजे एक तासाचा गतिरोध निर्माण झाल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. या प्रकारामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचे नमूद आहे. ३० सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय बार्शी येथे आरटीएस प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधित इसम सोमनाथ गिरी यांच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.