सोलापूर : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त शासकीय रक्तपेढी, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे विविध जनजागृतीपर उपक्रम उत्साहात पार पडला. स्वैच्छिक रक्तदानाबाबत जनजागृती करण्यात आली. रक्तदात्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला.
या निमित्ताने रुग्णालय परिसरात रक्तदान विषयक माहितीपूर्ण पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले. रक्तदानाचे महत्त्व, त्याविषयीचे गैरसमज आणि वस्तुस्थिती, रक्तदात्यांची पात्रता तसेच रक्तदानामुळे वाचणाऱ्या रुग्णांच्या जीवनाचे महत्त्व याबाबत आकर्षक पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांच्या हस्ते झाले. स्वैच्छिक रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन डॉ. ऋत्विक जयकर यांनी केले. या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. तोडकर, विकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुनीता दंतकाळे, रक्तकेंद्र प्रमुख डॉ. सुशील सोनावणे, सोलापूर सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कसबे, डॉ. प्रदीप गाडगीळ, डॉ. औदुंबर मस्के, डॉ. खरे, डॉ. शेटे, डॉ. खिस्ते, डॉ. ऐश्वर्या गवई, डॉ. शुभांगी दिलपाके यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
रक्तदानाविषयी माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले. दरम्यान, सोलापूर सर्जिकल सोसायटीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच दिवशी जिल्हा कोषागार कार्यालयातही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
Post Views: 21