सोलापूर : अचूक व विश्वासार्ह माहिती हेच विकास नियोजनाचे अधिष्ठान आहे. अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे, नागरिकांशी सौजन्याने वागावे आणि कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले.
आगामी ‘जनगणना 2027’च्या तयारीला सोलापूर शहरात वेग आला असून, प्रगणक (कर्मचारी) आणि पर्यवेक्षकांसाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. डिजिटल पद्धतीने होणाऱ्या या जनगणनेच्या कामकाजाची सखोल माहिती यावेळी देण्यात आली. त्या प्रसंगी ते बोलत होते. भारताच्या 155 वर्षांच्या जनगणना परंपरेतील ही 16 वी जनगणना असून, 2011 नंतर प्रथमच ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. 2021 मध्ये होणारी जनगणना कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता 2026-27 या कालावधीत जनगणना पार पडणार आहे. यंदा जनगणना पूर्णतः डिजिटल माध्यमातून होणार असून ‘एचएलओ’ (HLO) अॅपच्या माध्यमातून माहिती संकलन केले जाणार आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान नागरिकांना स्वतः माहिती भरता येणार आहे, तर 16 मे ते 15 जून या कालावधीत प्रगणक घराघरात जाऊन माहिती नोंदवणार आहेत.
प्रशिक्षणात जनगणनेची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, माहिती संकलनाची पद्धत आणि उद्भवणाऱ्या अडचणींवरील उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनीही जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करून अचूक माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी संदीप कारंजे, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी आशिष लोकरे, सहायक आयुक्त गिरीश पंडित, शशिकांत भोसले, जिल्हा जनगणना समन्वयक अजित बांड (मुंबई), तसेच सुनिता हिबारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रूथ भंडारे यांनी केले.
























