वेळापूर – माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी येथे एकाच कुटुंबातील पिता-पुत्राचे एकाच दिवशी निधन झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. भारत केशव भाकरे (वय ५४) व त्यांचा मुलगा अमोल भारत भाकरे (वय २४) या दोघांचेही शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) पहाटेच्या सुमारास निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे वेळापूर, पिसेवाडी व भाकरेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत भाकरे यांच्यावर गेल्या दीड महिन्यापासून पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, त्यांचा मुलगा अमोल भाकरे याचा १२ एप्रिल रोजी वेळापूर येथील डी.एड. कॉलेजजवळ पंढरपूर-पुणे पालखी मार्गावर थांबलेल्या वाहनाला धडकून अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी वडिलांच्या निधनानंतर अवघ्या एका तासाच्या अंतराने अमोलनेही मृत्यूशी सुरू असलेली झुंज हरली.
पिता-पुत्राचे एकाच दिवशी निधन झाल्याने भाकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा आधार असलेले दोन कर्ते पुरुष एकाच वेळी निघून गेल्याने संपूर्ण पिसेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना परिसरातील नागरिकांच्या मनाला चटका लावणारी ठरली असून अनेकांनी भाकरे कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अशा प्रकारची दुर्दैवी घटना एखाद्या कुटुंबावर किती मोठा आघात करते याची जाणीव या घटनेतून प्रकर्षाने होत आहे. या दुःखातून सावरणे भाकरे कुटुंबासाठी अत्यंत कठीण असले तरी परिसरातील नागरिक त्यांच्या पाठीशी उभे आहेत.

























