सोलापूर : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करत मोहोळ तालुक्यातील काही दूध डेअऱ्यांमधून कथितरित्या भेसळयुक्त व केमिकलयुक्त दूध पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप करत त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजा दिंडोरे आणि कार्याध्यक्ष मारुती जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
मोहोळ तालुक्यातील काही दूध संकलन केंद्रे व डेअऱ्यांमधून मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दूध तयार करून बाजारात पुरवठा केला जात असल्याची तक्रार गेल्या तीन महिन्यांपासून संबंधित विभागाकडे करण्यात येत आहे. काही डेअऱ्यांकडून दररोज मोठ्या प्रमाणात दूध संकलन केले जात असून या दूध व्यवसायात भेसळीचे प्रकार होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित डेअऱ्यांची चौकशी करून दूधाचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काही ठिकाणी धाडी टाकल्यानंतरही योग्य कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी अन्न व औषध प्रशासनाने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. भेसळयुक्त दूध व्यवसायावर आळा बसल्यास शेतकऱ्यांच्या शुद्ध दूधाला योग्य भाव मिळेल व दुग्ध व्यवसायाला चालना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Post Views: 16