पंढरपूर – शहरातील कृष्णाचा हौद परिसरातील भाजीमंडईचे स्वरुप दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ही मंडई बाजारपेठेतील रहदारीच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या रस्त्यांवर देखील भरु लागल्याचे दिसत आहे. या रस्त्यावरील मंडई मुळे ग्राहकांची, विक्रेत्यांची तसेच या भागातील कायमस्वरुपी दुकानदारांची देखील मोठी गैरसोय होवू लागलेली आहे. पावसाळ्यात तर येथील मंडईचे अक्षरश हाल,बेहाल होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या मंडईचे स्थलांतर पालिकेने शहरातील अन्यत्र ठिकाणी करावे अशी मागणी शहरातील सुज्ञनागरिकांकडून केली जात आहे.
पंढरपूर शहरात इंदिरागांधी भाजी मंडई व कृष्णाच्या हौदापाशी भरणारी भाजी मंडई या नागरिकांच्या दृष्टीने सोयीच्या समजल्या जात होत्या. मात्र कृष्णाच्या हौदाच्या परिसरातील मंडईचे दिवसेंदिवस स्वरुप बदलत चाललेले दिसत आहे. येथील मंडईचा परिसर हा शहरातील बाजारपेठेचा परिसर म्हणून देखील ओळखला जात असतो. या मंडई मध्ये ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंडईसाठीची जागा सध्या अपुरी पडू लागलेली आहे. त्यामुळे अगदी बोहरी पेट्रोलपंपा पर्यंत भाजी विक्रेते बसू लागल्याचे दिसत आहे.
या मंडई मध्ये कुठेही भाजी विक्रेत्यासाठी दगडी कट्टे बांधण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यावरच बसुन भाजी विक्री करावी लागत आहे. परिणामी रस्त्यावरील धुळ अक्षरश: भाजीवर बसत असते. त्याच प्रमाणे पावसाळ्यामध्ये थोडा जरी पाऊस झाला तरी चिखलात बसुन विक्रेत्यांना भाजी विक्री करावी लागते. त्यामुळे विक्रीसाठीचा भाजीपाला देखील खराब होत असतो. या बरोबरच या भागात ज्या कायमस्वरुपी दुकानदारांची मोठी दुकाने आहेत त्यांच्या दुकाना समोरच हे भाजी विक्रेते बसत असल्यामुळे कायमस्वरुपी दुकानदार मंडळींना देखील अडचणीचे होते. त्यामुळे व्यापारी आणि भाजीविक्रेते यांच्या मध्ये दररोज तु तु मै मै च्या घटना घडताना दिसुन येतात.
———————————–
चौकट : ( सण, उत्सवाच्या दिवशी मोठी गर्दी ,चोरट्यांची होते चंगळ )
बाजारपेठचा भाग असल्यामुळे वर्षभरातील महत्वाच्या विविध सण आणि उत्सवाच्या दिवशी तर येथील भाजी मंडई मध्ये खरेदीदार तसेच विक्रेत्यांची तोबा गर्दी असते. गर्दीमुळे अनेक वेळा येथील मंडईत चोरट्यांकडून ग्राहकांचे मोबाईल, पैसे,पाकिटे चोरीच्या अनेक घटना घडतात.
————————————–
चौकट : ( भाजीमंडई मुळे वाहतूकीची कोंडी )
कृष्णाचा हौद परिसर हा संपुर्ण मुख्य बाजारपेठेचा महत्वाचा समजला जाणारा परिसर आहे. त्यामुळे भाजी विक्रेते,फळविक्रेत्यांचे हातगाडे रस्त्यावरच ठाण मांडुन उभे असल्यामुळे दररोज या ठिकाणच्या शिवाजी महाराज चौक ते अर्बंन बँक, अर्बँन बँक ते कर्नल भोसलेचौक, भादुलेचौक ते बोहरी पेट्रोलपंप, प्रिन्स गांधी दुकान समोरील रस्ता अशा वाहतूकीच्या दृष्टीने महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी होण्याचे प्रकार सातत्याने घडताना दिसतात.
———————————
चौकट : ( कायस्वरुपी दुकानदारांची पालिकेकडे सातत्याने मागणी )
कृष्णाचा हौद परिसरातील भाजी मंडईचे ठिकाण पालिकेने बदलुन दुसऱ्या पर्यायी जागेवर ती भरविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी त्या भागातील कायमस्वरुपी असलेल्या दुकानदार मंडळींकडून सातत्याने पालिकेकडे केली जात आहे.
———————————
चौकट : ( मंडईसाठी शहरातील या पर्यायी जागा उपलब्ध )
शहरातील जुन्या एसटी स्टँण्ड समोरील पार्किंगसाठी आरक्षीत असलेली जागा, भक्ती मार्गावरील खादी ग्रामोद्योगाची जागा, जिजामाता उद्यानाची पिछाडी, टिळकस्मारक मंदिराच्या मैदानाची जागा तसेच चंद्रभागा बसस्थानकाच्या बाजुची मोकळ्या जागेवर,महावीर नगर पाण्याच्या टाकीपरिसरातील खुली जाग आदीं ठिकाणी कृष्णाचा हौद परिसरातील मंडईचे स्थलांतर करता येऊ शकेल का या बाबत देखील पालिकेने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
——————————
कोट
ग्रामीण भागातून आम्ही दररोज ताजीभाजी घेऊन येथे विक्रीसाठी येतो. पालिका आमच्याकडून रस्त्यावर बसण्यासाठीची पावती फाडून फी वसुल करते. मात्र त्या मानाने सुविधा नसतात. नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर बसूनच भाजी विक्री करावी लागते.
भीमा गावंधरे ( भाजी विक्रेता )
———————————
कोट
या भागात आमची कायमस्वरुपी दुकाने आहेत. आमच्या दुकाना समोरच ग्रामीण भागातून आलेले शेतकरी भाजी घेऊन विक्रीसाठी बसतात. त्यामुळे त्यांच्यात व आमच्यात दररोज वाद होत असतात. त्यामुळे पालिकेने मंडईसाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी.
नितीन गांधी (कायमस्वरुपी दुकानदार)
————————————
कोट
ग्रामीण भागातून शेतकरी ताजीभाजी घेऊन येथे विक्रीसाठी येत असल्यामुळे आम्ही भाजी खरेदीसाठी येथे येतो. मात्र रस्त्यावरच भाजी विक्रेते बसत असल्यामुळे या भागात वारंवार वाहतूकीची कोंडी होते. वाहन पार्किंगसाठी येथे खास जागा देखील नाही. पावसाळ्यात चिखलातूनच मार्ग काढावा लागतो. त्यामुळे भाजी घेताना आम्हा महिलांना खूपच अडचणीचे होते.
मालती माने ( महिला ग्राहक )
Post Views: 3