सोलापूर – शिक्षक भरती २०२५ अंतर्गत पवित्र पोर्टलवरून निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या, कागदपत्र पडताळणी, प्रशासकीय कार्यवाही आणि समुपदेशनाची प्रक्रिया पूर्ण करून शाळांची निवड केलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. शिक्षक – पदवीधर आमदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे नियुक्ती आदेश रखडण्याची शक्यता निर्माण झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने निवडणूक आयोगाकडून स्पष्ट मार्गदर्शन घेऊन नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेसह स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या संघटनांकडून करण्यात आली आहे.
पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेतील आवश्यक टप्पे पूर्ण झालेल्या उमेदवारांची नियुक्ती केवळ आचारसंहितेच्या कारणामुळे प्रलंबित ठेवण्याऐवजी संबंधित प्राधिकरणाने निवडणूक आयोगाकडून आवश्यक परवानगी अथवा मार्गदर्शन घ्यावे, अशी भूमिका संघटनांनी मांडली आहे. यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य तसेच शालेय शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या पात्र उमेदवारांच्या नियुक्तीबाबत निवडणूक आयोग आणि शालेय शिक्षण विभागाने नियमानुसार निर्णय घेऊन उमेदवारांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनीही समुपदेशन आणि शाळा निवडीची प्रक्रिया पूर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. आचारसंहितेचे पालन आवश्यक असले तरी भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आयोगाचे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करता येईल का, याची स्पष्टता शासनाने करावी. शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून शिक्षकांची गरज लक्षात घेता प्रक्रिया लवकर मार्गी लावावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चौकट
निवड प्रक्रिया पूर्ण; मग नियुक्तीला विलंब का?
शिक्षक भरतीतील उमेदवारांनी निवड, कागदपत्र पडताळणी, प्रशासकीय कार्यवाही, समुपदेशन आणि शाळा निवडीचे टप्पे पूर्ण केले आहेत. त्यामुळे नियुक्तीपूर्वीची बहुतांश प्रक्रिया पूर्ण झालेल्या उमेदवारांच्या बाबतीत पुढील कार्यवाहीबाबत स्पष्टता निर्माण करण्याची गरज आहे. आचारसंहितेचे पालन करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार नियुक्ती आदेश देता येतील का, याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
चौकट
शाळा सुरू; शिक्षकांची गरज कायम
राज्यात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू असताना शिक्षकांची रिक्त पदे कायम राहिल्यास त्याचा परिणाम अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर होऊ शकतो. त्यामुळे भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत शासनाने नियमांची चौकट स्पष्ट करून निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकट
‘आचारसंहितेचा सन्मान ठेवून मार्ग काढावा’
आदर्श आचारसंहितेचा कोणताही भंग होऊ नये, याची दक्षता घेत निवडणूक आयोगाकडून आवश्यक मार्गदर्शन घेऊन नियुक्ती प्रक्रियेला दिशा द्यावी. उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली असताना निर्माण झालेली अनिश्चितता दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका संघटनांनी व्यक्त केली आहे.