सोलापूर – जिल्ह्याचे नूतन जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी शुक्रवारी जिल्हा आरोग्य अधिकारी या पदाचा पदभार स्वीकारला. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मावळते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व पदाची सूत्रे त्यांच्याकडे सुपूर्द केली.
पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ. कोपूरवाड यांनी पंढरपूर येथे कुटुंबासमवेत जाऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. जनसेवेच्या कार्यासाठी आशीर्वाद घेऊन ते सोलापूर येथील कार्यालयात दाखल झाले.याप्रसंगी मावळते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ संतोष नवले यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारीवृंद यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी आणि जिल्हा आरोग्य कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























