सोलापूर – पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांचेकडील पत्र क्र. दि.05 जून 2026 रोजीच्या पत्राअन्वये उपरोक्त विषयास अनुसरून सादर की, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आपाढीवारी यात्रा दि.19 जूलै 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत संपन्न होत आहे. आषाढीवारी यात्रेचा मुख्य दिवस दि.24 जुलै 2026 दशमी, दि. 25 जुलै 2026 देवशयनी आषाढी एकादशी व दि. 29 जुलै 2026 पौर्णिमा आहे. आषाढीवारी यात्रा कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक लोक श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येत असतात. तसेच आगामी आषाढीवारी यात्रा कालावधीमध्ये दहशतवादी संघटना जसे की, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहीद्दीन व इतर संघटनाकडून त्यांचे स्लीपर सेल सक्रीय केले जाण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान या देशांमध्ये तणावाचे दरम्यान ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे दिसून आले आहे. दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी हे स्थानिक लोकात मिसळुन तात्पुरत्या स्वरुपात वास्तव्य करुन आगामी उत्सव कालावधीमध्ये ड्रोनद्वारे घातपाती कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अशा घटनांमुळे जनमाणसामध्ये घबराटीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. दहशतवादी कारवायामध्ये दहशतवादी हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ड्रोनचा वापर करीत आहेत.
ज्याअर्थी सोलापूर जिल्हयातील आपल्या स्थळसिमा हद्दीतील सर्व मर्मस्थळे व महत्वाचे धार्मिक स्थळे श्री. विठ्ठल रूक्मीणी मंदिर, पंढरपूर ,श्री. स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट तसेच पालखी मार्ग यांचे सुरक्षेच्या दृष्टीने सदर ठिकाणी ड्रोन उडविण्यास परवानगी देण्यात येवू नये. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या एखाद्या दहशतवादी कारवाईस, गुन्हयास प्रतिबंध होवू शकतो व सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहण्यास मदत होईल. तसेच लोकामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होवून सार्वजनिक शांतता वाढीस लागण्यास बळ मिळेल.
वर नमुद सर्व परिस्थितीचा विचार करून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार घोषणापत्र काढून संबंधित पोलीस ठाणे हद्दीतील सर्व मर्मस्थळे, महत्वाचे धार्मिक स्थळे, पालखी मार्ग यांचे सुरक्षेच्या दृष्टीने सदर ठिकाणी ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषणापत्र जाहिर करण्यात यावे. तसेच जिल्हयातील ड्रोन परवाना धारक वे चालक यांनी त्यांचेकडील ड्रोनची माहिती संबंधित पोलीस ठाणेला देणे बंधनकारक करणेबाबत आपले कार्यालयाकडून सोलापूर जिल्हयाचे ग्रामीण हद्दीत व सर्व नगरपालिका हद्दीत लागू करण्यात यावे. सदर घोषणापत्र दिनांक- 08जून 2026 रोजी पासून पुढे 60 दिवस लागू करण्याबाबतचे आदेश काढणे व या धार्मिक स्थळी येणाऱ्या सर्व पालखी मार्गावर टि.व्हि. चॅनल्स, खाजगी व्यक्ती, संस्था तसेच पालखी सोहळ्याचे छायाचित्रण करणारे यांना नोटीस देऊन त्यांची वाजू ऐकणे शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढण्यात येत आहेत.
सोलापूर ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद वगळून) व सर्व नगरपालिका हद्दीत दि. 08जून 2026 रोजी पासून पुढे 60 दिवस या कालावधीत सोलापूर जिल्हयातसर्व मर्मस्थळे, महत्वाचे धार्मिक स्थळे श्री. विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, पंढरपूर, श्री. स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट येथे ड्रोन उडविण्यास बंदी चे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिले आहेत.























