मंगळवेढा – मंगळवेढा तालुक्यात यंदाच्या पावसाळी हंगामात मृग नक्षत्रापासून पावसाने दडी मारल्यामुळे याचा परिणाम खरीपाच्या पेरणीवर झाला असून 17 हजार 716 हेक्टर क्षेत्रावर केवळ 77.44 टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडे नोंद झाली आहे.
यंदा पावसाळी हंगामात 7 जून मृग नक्षत्रापासून ते जुलै अखेर निसर्गाने पाठ फिरवल्यामुळे खरीप पेरणीला मोठी अडचणी निर्माण झाली होती. तालुक्याच्या दक्षिण भागात खरीप पेरणीचे क्षेत्र 22 हजार 877 हेक्टर इतके असून त्यावर 17 हजार 716 हेक्टर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये पेरणी क्षेत्र बाजरी 3 हजार 674,मका 6 हजार 533, तृणधान्य 10 हजार 207,तूर 3 हजार 974,मुग 117,उडीद 1 हजार 691, कडधान्ये 5 हजार 782 अशी पेरणी झाली आहे. ज्या शेतकर्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्या शेतकर्यांनी खरीपाची पेरणी केल्याचे सांगण्यात आले. गतवर्षी 20 मे पासून पावसाला प्रारंभ होवून तो सलग तीन महिने सुरु होता. यंदामात्र निसर्गाचे उलटे चक्र निर्माण झाले असून शेतकर्यांना अजूनही आकाशाकडे नजर लावून बसण्याची वेळ आली आहे. आकाशात काळेकुट्ट ढग येतात हे दृश्य पाहून शेतकर्यांना पाऊस पडेल अशी अपेक्षा असते मात्र पाऊस पडतच नाही असे गेली दोन महिने नैसर्गिक चित्र मंगळवेढा तालुक्यात सुरु आहे. वार्याचा वेग अधिक असल्यामुळे पावसाचे आलेले ढग वार्याच्या वेगाने पुढे निघून जात असल्याने पाऊस पडत नसल्याचा अनुभव शेतकर्यांनी कथन केला. शासनाने शेतकर्यांना पिक विमा भरण्याचे आवाहन केले असून यंदा पाऊस नसल्यामुळे पेरणी कमी प्रमाणात झाल्याने विमा भरण्यात शेतकरी नाखूश असल्याचे दिसून येत आहे. पाटीमागे सरकारने एक रुपया पिक विमा ठेवल्याने शेतकर्यांना दिलासा मिळत होता. तो एक रुपया बंद करुन विमा रक्कम वाढवल्याने शेतकरी वर्ग शासनावर नाराज झाले असून त्यांनी पिकविम्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.
Post Views: 49