बार्शी – भगवंत महोत्सवाच्या माध्यमातून बार्शी शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प असून, येत्या काळात श्री भगवंत मंदिर व परिसराचा सर्वांगीण कायापालट करण्यात येणार आहे, अशी ठाम ग्वाही भगवंत महोत्सवाचे संकल्पक तथा माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
येत्या २८ एप्रिल रोजी भगवंत प्रकटोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, त्यांच्या आगमनामुळे तीर्थक्षेत्र विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तीर्थक्षेत्राच्या उभारणीसाठी राजसत्ता व देणगीदारांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नगरपालिका इमारत जुन्या सरकारी दवाखान्याच्या जागेत स्थलांतरित करुन सध्याची इमारत मंदिर परिसराच्या विकासासाठी वापरण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव यांनी भगवंत महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडत असल्याचे सांगितले. या महोत्सवामागे राजाभाऊ राऊत यांची मोठी मेहनत असून अनेकांनी सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही हा महोत्सव अधिक भव्य स्वरुपात आयोजित करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पावसामुळे पुढे ढकलण्यात आलेला “होम मिनिस्टर” कार्यक्रम २८ एप्रिल रोजी विशेषतः महिलांसाठी पुन्हा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
भगवंत महोत्सवाच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या “ऑल दि बेस्ट” या गाजलेल्या मराठी विनोदी नाटकाने बार्शीकरांना अक्षरशः खळखळून हसवले. हलक्या-फुलक्या कथानकासोबत उत्कृष्ट अभिनय, नेमकेपणा आणि अचूक कॉमिक टायमिंग यामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार ठरला.
देवेंद्र पेम लिखित व दिग्दर्शित या नाटकात मयूरेश पेम यांनी मुक्या मित्राची, मनमीत पेम यांनी बहिऱ्या मित्राची, तर निखिल चव्हाण यांनी आंधळ्या मित्राची भूमिका साकारली. झुई पेडखळे यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारत प्रभावी उपस्थिती दर्शवली.
नाटकाची कथा तीन मित्रांभोवती फिरते. एक आंधळा, एक बहिरा आणि एक मुका असे हे तिघे एका मुलीच्या प्रेमात पडतात. त्यानंतर स्वतःच्या उणिवा लपवून एकमेकांना मागे टाकण्याच्या प्रयत्नातून निर्माण होणारे गैरसमज, प्रसंग आणि विनोदी घडामोडी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. संवादफेक, आंगिक अभिनय आणि प्रसंगांची मांडणी यामुळे प्रत्येक क्षण रंगतदार झाला. विशेष म्हणजे संवाद नसतानाही केवळ हावभाव आणि अभिनयातून उभा राहणारा विनोद प्रेक्षकांना अधिक भावला.
सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक विनोदी प्रसंगाला टाळ्यांचा कडकडाट आणि हास्याचा वर्षाव होत होता. आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव विसरायला लावणारे आणि कुटुंबासोबत आनंद देणारे असे हे नाटक असल्याची भावना अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली. “ऑल दि बेस्ट” या नाटकाने पुन्हा एकदा आपल्या लोकप्रियतेची मोहोर उमटवली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, भाजपा युवा नेते ऍड. रणवीर राऊत, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, शिवशक्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश बुरगुटे, डॉ. गुलाबराव पाटील, डॉ. सातपुते, डॉ. रोहन पाटील, डॉ. अमित पडवळ, संतोष शहा, गौतम कणकरिया, सिद्धार्थ शहा, डॉ. योगेश सोमाणी, गणेश नान्नजकर, दत्तप्रसाद पाटील, राहुल खुणे, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, मंदार कुलकर्णी, विशाल लगडे, नगरसेवक विजय राऊत, राजाभाऊ सुरवसे, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण बरबोले, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, पं. स. चे उपसभापती संतोष निंबाळकर, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, डॉ. संजय अंधारे, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांच्यासह बार्शी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती संचालक, माजी नगरसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमास मोठा जनसमुदाय उपस्थित होता.






















