सोलापूर : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन संस्थेचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली आणि सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, व्हाइस चेअरमन राजेशम येमूल, रमेश विडप, डॉ. विजयकुमार आरकाल, आनंद चंदनशिवे, डॉ. लता पाटील, श्रीनिवास क्यातम, लक्ष्मीनारायण कुचन, डॉ. सुधाकर गुंडेली, राजू हौशेट्टी आदी उपस्थित होते.
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोलापूरसह परिसरातील हजारो भाविक दरवर्षी श्रद्धेने पायी प्रवास करतात. या प्रवासात लांबचे अंतर चालल्यामुळे थकवा, पाय दुखणे, निर्जलीकरण तसेच अन्य आरोग्यविषयक त्रासांना सामोरे जावे लागते. अशा वेळी भाविकांना तातडीने आरोग्यसेवा मिळावी, त्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचार उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
धार्मिक यात्रेदरम्यान भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. श्रद्धेच्या प्रवासात आरोग्यसेवेचा आधार मिळाल्याने भाविकांना दिलासा मिळणार असून, त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.
Post Views: 12