जालना – मागील दीड महिन्यापासून बदनापूर तालुक्यासह जालना जिल्ह्यात तसेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, तूर, मूग यांसह विविध खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला असून जवळपास सर्व पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी बदनापूर तालुक्यातील नजीक पांगरी, केळीगव्हाण, राजेवाडी, दावलवाडी आदी गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान बदनापूर तालुक्यातील अनेक भागांत पावसाचा दीर्घ खंड पडल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. परिणामी सोयाबीन पिक पूर्णपणे वाळले आहे. कापूस, तूर आणि मूग या पिकांनाही पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे. या पिकाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे, कपाशीला दोन-दोन चार-चार बोंड आले आहेत, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतातील पिकाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करावे आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. तसेच पीक विमा, दुष्काळी मदत आणि इतर शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळावा, अशी शेतकऱ्यांनी रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केली.
पावसाने ओढ दिल्याने यंदा खरीप पिकांची स्थिती नाजूक असून जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मोठा पाऊस न झाल्याने शंभर टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत देऊन दुष्काळात करण्यात येणाऱ्या उपाययोजना तात्काळ राबवेल असा विश्वास माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. शासन काय उपाय योजना करणार याची माहिती दिली. यावेळी काही शेतकऱ्यांना आश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. पिण्याचे पाणी, हाताला रोजगार,जनावरांना चारा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत या गोष्टींना प्राधान्य असून त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आता मोठा पाऊस पडला तरी खरिपाच्या पिकांना लाभ होणार नाही. मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होऊ शकते.
यावेळी खासदार कल्याण काळे यांनी बदनापूर येथे केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत दानवे यांनी प्रत्युत्तर दिले. “आमचे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार नाही, तर शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे ते म्हणाले. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी आमच्या सरकारने काय करावे हे सांगू नये त्यांनी काय केले हे प्रथम सांगावे त्यांच्या सरकारच्या काळात फक्त एक हेक्टरक्षेत्राला मदत मिळत. आमच्या सरकारने दोन हेक्टर क्षेत्राला मदत जाहीर केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन वर्षे मुख्यमंत्री होते. एक अथवा दोन वेळेस ते मंत्रालयात गेले. त्यांनी निवडणूक आयोगाविरूद्ध बोलण्याऐवजी दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकरी यावर बोलण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेंचा कोणावरच विश्वास नसल्याची खरमरीत टीका दानवे यांनी केली.
यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, वसंतराव जगताप, भगवान कदम, किशोर कदम, पद्माकर जऱ्हाड, कैलास तात्या मदन, विलासराव जऱ्हाड, प्रदीप साबळे, हरिभाऊ सुकासे, कल्याणराव काळे, विष्णू कोल्हे, जनाबापू चोरमारे, परमेश्वर शिंदे, संजय घुगे, रुद्रदेव, भगवानराव मदन, शिवाजी वेताळ, गजानन काटकर, अमोल चव्हाण, गजानन मोरे, राजाभाऊ निंबाळकर, आप्पा पाटील कदम, हरिभाऊ कबाडे, नवनाथ वाघ, अनिल कोळकर, विकास वाघ, ॲड. बालाजी वाघ, श्रीराम वाघ, संतोष कदम, संजय घुशिंगे, रामसिंग घुशिंगे, आदिनाथ फटाले, तात्याराव म्हात्रे, भरत कान्हेरे, परमेश्वर कबाडे, ज्ञानदेव मदन, किशोर कदम, किशोर जाधव, गणेश जगताप, परसराम जोगदंड, अमोल जगताप, संदीप चंद यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

























