किनवट / नांदेड : किनवट तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने कडक व आक्रमक भूमिका घेतली असून या अनुषंगाने धडक मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवार, दि. 24 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता मौजे मारेगाव खालचे येथे अवैधरीत्या रेती वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर रेतीसह रंगेहाथ पकडण्यात आला.
संबंधित ट्रॅक्टर जप्त करून तो तहसील कार्यालय, किनवट येथे लावण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्रा दोन्तुला व तहसीलदार डॉ. शारदा चोंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या विशेष पथकाने केली.
या पथकात मंडळ अधिकारी डी. आर. कांबळे, ग्राम महसूल अधिकारी बी. एल. काळे, तसेच आकाश राजकोल्हे, श्रीनिवास रेड्डीवार, सुशील जाधव, आदिनाथ डुकरे, मंगेश बोधे, विशाल सटलावर, विवेक पलीकोडावर, शुभम जिलेवाड व विश्वास फड आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
महसूल विभागाने गेल्या सहा महिन्यांत अवैध वाळू व इतर गौण खनिज तस्करीविरोधात एकूण 20 प्रकरणांत कारवाई केली असून, या कारवाईतून शासनाच्या तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल जमा झाला आहे. या सातत्यपूर्ण कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू तस्करीवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे चित्र दिसून येत आहे.
सदर सर्व कारवाया सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्रा दोन्तुला व तहसीलदार डॉ. शारदा चोंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या विविध पथकांमार्फत करण्यात आल्या आहेत. पुढील काळातही अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे.
























