सोलापूर : वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने 161व्या रिक्षा स्टॉपचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. छत्रपती संभाजी तलाव येथील रिक्षा स्टॉपचे उद्घाटन अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे आणि महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी सरकारकडे कल्याणकारी मंडळाची सभासद फी कमी करण्याची जोरदार मागणी केली. त्यांनी सांगितले की, कल्याणकारी योजनेच्या नावाखाली चालकांकडून 800 रुपये आकारून त्यांचे खरे कल्याण कसे होणार, असा सवाल उपस्थित केला. सरकार चालकांना मदत करण्याऐवजी लुटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच रिक्षा चालकांनी एकजूट होऊन आपल्या हक्कासाठी लढा देण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांनी रिक्षा चालकांना आश्वासन देताना सांगितले की, कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास ते चालकांसोबत ठामपणे उभे राहतील. नियमांनुसार कारवाई करण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला महासंघाचे महासचिव प्रदीप शिंगे, इम्रान शेख, शंकर राऊत, तुफान शेख, अमीन पटेल, सचिन शिर्के, मनोहर खांडेकर, स्टॉप अध्यक्ष मुखदुम शेख, अजहर शेख यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते.






















