सोलापूर, : उद्योग क्षेत्राच्या गरजा आणि अभियांत्रिकी शिक्षण यांच्यातील दरी कमी करून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या उद्देशाने वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT), सोलापूर येथे ‘इंटेलिजंट हायड्रॉलिक सिस्टिम्स सेंटर ऑफ एक्सलन्स’ तसेच १५० किलोवॅट फ्लुइड पॉवर टेस्ट लॅब यांचे उद्घाटन उत्साहात झाले. या नव्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
ही सुविधा डॅनफॉस इंडस्ट्रीज प्रा. लि. यांच्या सहकार्याने उभारण्यात आली असून, आधुनिक फ्लुइड पॉवर, हायड्रॉलिक नियंत्रण प्रणाली आणि औद्योगिक अनुप्रयोग यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे. उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाशी थेट परिचय होऊन विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यास या केंद्राची महत्त्वपूर्ण मदत होणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी डॅनफॉस इंडस्ट्रीज प्रा. लि.चे सिनिअर डायरेक्टर व सेंटर हेड राहुल वळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डब्ल्यू.आय.टी. संस्थेच्या प्रगतीशील शैक्षणिक दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, डब्ल्यू.आय.टी. हे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारे आणि उद्योगाभिमुख शिक्षण देणारे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. महाविद्यालयातील अत्याधुनिक स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर, आधुनिक प्रयोगशाळा व उद्योगांच्या गरजांनुसार विकसित केलेल्या सुविधा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. येथील दर्जेदार शैक्षणिक वातावरण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया निर्माण करत आहेत.
वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त वैभव गांधी म्हणाले, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील समन्वयाची आवश्यकता अधोरेखित करताना सांगितले की, आजच्या वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक युगात केवळ सैद्धांतिक ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळा, चाचणी सुविधा आणि उद्योगसदृश वातावरण उपलब्ध होणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून विद्यार्थी संशोधन, नवोपक्रम, प्रकल्प विकास आणि वास्तविक औद्योगिक समस्यांवर काम करण्यास सक्षम होतील.
या केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात आलेली १५० किलोवॅट क्षमतेची फ्लुइड पॉवर टेस्ट लॅब विद्यार्थ्यांना हायड्रॉलिक प्रणालींचे डिझाइन, कार्यपद्धती, कार्यक्षमता परीक्षण आणि तांत्रिक विश्लेषण यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणार आहे. यामुळे अभियांत्रिकी शिक्षण अधिक प्रयोगशील, उद्योगाभिमुख आणि भविष्योन्मुख होण्यास चालना मिळणार आहे.
‘इंटेलिजंट हायड्रॉलिक सिस्टिम्स सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि अत्याधुनिक टेस्ट लॅबच्या स्थापनेद्वारे वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने उद्योग शिक्षण सहकार्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, भविष्यातील कुशल, संशोधनाभिमुख आणि जागतिक स्तरावर सक्षम अभियंते घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास डॉ. सचिन गेंगजे यांनी व्यक्त करण्यात आला.
इंजिनिअरिंग V&V लॅबचे डायरेक्टर सुधाकर सांगळे, सिनिअर मॅनेजर मनोज घोडमारे , फायनान्स कंट्रोलर राजेश जाधव, मॅनेजर टेस्ट लॅब सचिन कामटी , डेप्युटी मॅनेजर तेजस तुपे, ऑपरेशनल एक्सलन्स इंजिनिअर भागेश जगताप, भूपेश मालखेडे, श्री निखिल गोरे आणि श्री महेश वाघमारे यांच्यासह वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, भूषण शहा, पराग शहा, प्रभारी प्राचार्य डॉ. सचिन गेंगजे, मेकॅनिकल अँड ऍटोमेशन इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. भाग्येश देशमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.






















