सोलापूर : राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या निदर्शनास आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अल्पवयीन मातांच्या प्रकरणाला अत्यंत गंभीर व संवेदनशील मानत आयोगाने तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
बालविवाह, लैंगिक अत्याचार तसेच सामाजिक व आर्थिक कारणांमुळे अल्पवयीन मुलींना मातृत्वाचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करत आयोगाने याला बालहक्कांचे गंभीर उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास, आरोग्य, पोलीस आणि शिक्षण विभागांचे संयुक्त विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या पथकाने एक ते दीड महिन्यांच्या आत सविस्तर कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.
या संदर्भातील सुनावणी आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय विष्णू पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सचिव पंकज देवरे (भा.प्र.से.), सदस्य गीतांजली बुटी, शुभांगी तांबट, संजय लाखे पाटील, अतुल देसाई, प्रविण भुजाडे, मिलन जंगम तसेच अवर सचिव वंदना जैन उपस्थित होते.






















