सोलापूर – जिल्हा टेबल टेनिस संघटनेची उदयोन्मुख खेळाडू जिवनी जितेंद्र धर्मे हिने केंद्रीय विद्यालयाच्या विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवत अजिंक्यपद पटकावले. या घवघवीत यशामुळे तिची ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागीय स्पर्धा पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत जिवनीने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर सर्व प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिच्या चपळ हालचाली आणि अचूक फटक्यांसमोर प्रतिस्पर्धी खेळाडूंचा निभाव लागला नाही. जिवनीला या यशासाठी झेड. एम. पुणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
—–
राष्ट्रीय स्पर्धेतही ती अशीच कामगिरी करेल
“विभागीय स्तरावर सुवर्णपदक पटकावल्यानंतर आता जिवनी ऑगस्ट २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करणार आहे. जिवनीने अत्यंत जिद्दीने हे यश संपादन केले आहे. सोलापूरच्या टेबल टेनिस क्षेत्रासाठी ही अभिमानाची गोष्ट असून, राष्ट्रीय स्पर्धेतही ती अशीच चमकदार कामगिरी करेल,” असा विश्वास सोलापूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजीव प्रधान यांनी व्यक्त केला.






















