सोलापूर- सोलापूर येथील भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील संगणक अभियांत्रिकीचे विद्यार्थी कार्तिक किशोर कोथलकर यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी झेनोडो या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ओपन सायन्सच्या माध्यमातून 22 संशोधन पेपर प्रकाशित केले असून, त्यांच्या 22ही संशोधन पेपरना डीओआय (डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर) क्रमांक प्राप्त झाला आहे.
डीओआय म्हणजे डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर, अर्थात डिजिटल स्वरूपातील संशोधन साहित्याची स्वतंत्र व कायमस्वरूपी ओळख पटविणारा विशिष्ट क्रमांक. त्यामुळे प्रकाशित संशोधन पेपरची स्वतंत्र ओळख निर्माण होते आणि तो सहज शोधता व संदर्भित करता येतो.
कार्तिक किशोर कोथलकर यांनी विविध विषयांवर अभ्यास व संशोधन करून आपले संशोधन कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण संशोधन कार्यामुळे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात त्यांच्या योगदानाची नोंद झाली आहे.
अभियांत्रिकी शिक्षणासोबतच संशोधन क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत त्यांनी 22 संशोधन पेपर प्रकाशित करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदानातही भर पडली आहे.
या संशोधन कार्यासाठी सीसी रुपाली सरडे, विभागप्रमुख प्रा. आनंद ज्ञानबोटे तसेच प्राचार्य डॉ. अनिल देशमाने यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष अभियंता रवींद्रजी गायकवाड आणि सचिव अनामिका गायकवाड यांचेही प्रोत्साहन लाभले.
प्राचार्य डॉ. अनिल देशमाने यांनी कार्तिक किशोर कोथलकर यांचे संशोधन कार्य विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध व्हावे या उद्देशाने त्यांचे प्रकाशित संशोधन पेपर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना त्यांच्या संशोधन कार्याचा अभ्यास करता येणार आहे.
कार्तिक किशोर कोथलकर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयीन स्तरावर त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही त्यांनी संशोधन क्षेत्रात भरीव योगदान द्यावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.



















