सोलापूर – जिल्हा परिषद भवनात विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आता पायऱ्यांची धावपळ कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच वरच्या मजल्यावरील कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय लवकरच होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषद इमारतीत तीन ठिकाणी लिफ्ट बसविण्याच्या दृष्टीने जागांची पाहणी करण्यात आली असून, खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे.
जिल्हा परिषद भवनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अनेक महत्त्वाचे प्रशासकीय विभागांसह पदाधिकाऱ्यांचे कक्ष आहेत. त्यामुळे दररोज शेकडो नागरिकांना कामानिमित्त वरच्या मजल्यावर जावे लागते. मात्र, इमारतीत लिफ्टची सुविधा नसल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांना पायऱ्या चढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या समस्येवर उपाय म्हणून प्रशासनाने लिफ्ट बसविण्यासाठी तीन संभाव्य ठिकाणांची चाचपणी केली आहे. यामध्ये इमारतीच्या आतील बाजूस सामान्य प्रशासन विभागाच्या जिन्याशेजारी, पूर्व बाजूस समाजकल्याण सभापतींच्या कक्षासमोरील भागात तसेच पश्चिम बाजूस मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांच्या कार्यालयाशेजारील जागेचा समावेश आहे.
तिन्ही ठिकाणी लिफ्ट बसविण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येत आहे. हा सविस्तर प्रस्ताव १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. सभेची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही जिल्हा परिषद भवनात लिफ्ट बसविण्याचा विषय चर्चेत आला होता. मात्र, विविध कारणांमुळे हा प्रस्ताव पुढे सरकला नाही. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाल्यानंतर लिफ्टसाठी योग्य जागा निश्चित करून खर्चाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आता १३ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेतील मंजुरीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कोट
लिफ्ट सुविधा सुरू झाल्यास जिल्हा परिषद भवनातील विविध कार्यालयांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होणार असून, विशेषतः ‘दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी सुलभ प्रशासन’ या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
– दीपक वैद्य, अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर
चौकट
तीन ठिकाणी लिफ्टचा विचार
– सामान्य प्रशासन विभागाच्या जिन्याशेजारी
– पूर्व बाजूस समाजकल्याण सभापती कक्षासमोरील भागात
– पश्चिम बाजूस मुख्य वित्त व लेखा अधिकारी
कार्यालयाशेजारी
चौकट
नागरिकांना काय फायदा होणार?
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच आजारी किंवा हालचालींमध्ये अडचण असलेल्या नागरिकांना वरच्या मजल्यावरील कार्यालयांमध्ये सहज पोहोचता येणार आहे. तसेच शासकीय कामांसाठी होणारी गैरसोय आणि पायऱ्या चढण्याचा त्रासही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.