सोलापूर – पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या विजयासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या संस्थांमधील सुमारे १,७६० पदवीधर व शिक्षक मतदारांना एकत्र आणत शक्तिप्रदर्शन केले. भाजपच्या स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.
दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या विविध संस्थांमधील पदवीधर आणि शिक्षक मतदारांना सिद्धेश्वर पेठेतील ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या संपर्क कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी आठ वाजता एकत्र करण्यात आले. यावेळी मतदारांना मतदान केंद्र, मतदानाची प्रक्रिया आणि ओळखपत्रासंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या. मोठ्या संख्येने मतदार एकत्र आल्याने मतदानासाठी काही काळ रांगा लागल्याचे चित्र दिसले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी सातत्याने प्रयत्न केले. पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची क्षमता या उमेदवारांमध्ये असून, त्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्याचे माने यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
युवा नेतृत्वावर विजयाची मदार
भाजपच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे हे उच्चशिक्षित आणि युवा नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करतात. पदवीधरांच्या रोजगारासह विविध समस्या आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना शासनस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी ते सक्षम ठरतील, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य डॉ. पृथ्वीराज माने यांनी व्यक्त केला. युवा वर्ग भाजपच्या पाठीशी असल्याने दोन्ही उमेदवारांना विजयाची संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत संस्थात्मक पातळीवरील मतदारांचे संघटन आणि पक्षाच्या उमेदवारांसाठी केलेली एकजूट यामुळे सोलापुरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.




















