माढा : माढा बसस्थानकाची इमारत जुनी झाली असून ती जीर्ण अवस्थेत आहे. तसेच तेथील प्लॅटफॉर्म परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य असून प्रवाशांना त्याचा मोठा त्रास होत आहे. अनेक वेळा या ठिकाणी बस वेळेवर न आल्याचे निदर्शनास येते असल्याने शालेय विद्यार्थ्यां व प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने माढा शहर शिवसेना अध्यक्ष देविदास खरात यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पंढरपूर येथे भेट घेऊन माढा तालुक्यातील परिवहनाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन दिले आहे.

त्या निवेदनामध्ये माढा येथील जीर्ण झालेल्या एस.टी. बसस्थानकाच्या जागी आधुनिक, सर्व सुविधांनी युक्त नवीन बसस्थानक उभारण्यात यावे, बेरोजगारांना व्यवसायाची संधी मिळावी यासाठी व्यापारी संकुल विकसित करण्यात यावे त्याचबरोबर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि प्रवाशांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी, प्रशस्त प्रतीक्षालय, प्रकाश व्यवस्था व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या.तसेच विद्यार्थी, महिला, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी विविध नवीन एस.टी. बसमार्ग सुरू करावेत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सकाळी व सायंकाळी विशेष एस.टी. फेऱ्या सुरू करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निवेदनाची सकारात्मक दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना नेते पंडितजी साळुंखे, संपर्कप्रमुख अमोल केसरे, युवा सेना माढा शहर प्रमुख किरण पवार, संतोष कोळी तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 13