बार्शी – ज्ञान, संस्कार, गुणवत्ता आणि विश्वशांतीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे ध्येय बाळगणाऱ्या एमआयटी विश्वशांती शिक्षण समूहाचा ४४ वा स्थापना दिन एमआयटी विजय शाळा, बार्शी येथे उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विशेष परिपाठाने झाली. यावेळी एमआयटीच्या स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास, संस्थेची चार दशकांहून अधिक काळातील गौरवशाली वाटचाल तसेच शिक्षण, संशोधन, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीतील उल्लेखनीय योगदान यांचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला.
स्थापना दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांनी संस्थेच्या मूल्यांचे जतन करण्याची आणि समाजहितासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली. संस्थेचे दूरदर्शी संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, विश्वस्त मंडळ आणि व्यवस्थापन यांनी शिक्षणाच्या माध्यमातून घडविलेल्या परिवर्तनकारी कार्याबद्दल कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
यावेळी एमआयटी व्हीजीएसचे मार्केटिंग ग्रुप हेड दिपक काळोखे यांचा मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून एमआयटीच्या संस्कारप्रधान शैक्षणिक तत्त्वज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थापक, विश्वस्त, शिक्षक आणि पालक यांच्याविषयी आदर व्यक्त करत एमआयटीने दिलेल्या मूल्याधिष्ठित शिक्षणामुळेच स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडत असल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी मांडल्या.
वरिष्ठ शिक्षिका संध्या खंडागळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, शिस्त, सामाजिक उत्तरदायित्व आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याचे आवाहन केले.
मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या कार्याचा आढावा घेत ज्ञानासोबत संस्कार, चारित्र्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधणारे शिक्षणच विद्यार्थ्यांना सक्षम नागरिक बनवते, असे सांगत विद्यार्थ्यांना एमआयटीच्या मूल्यांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
स्थापना दिनानिमित्त शाळेतील सर्व वर्गांमध्ये ‘कहानी एक सोच की’ – प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या जीवनकार्यावर आधारित एक गीतमय माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती उत्सुकतेने जाणून घेतली. या सोहळ्यात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एमआयटी विश्वशांती शिक्षण समूहाच्या उज्ज्वल परंपरेचा अभिमान व्यक्त केला.
Post Views: 6