
सोलापूर – लिटिल चॅम्प क्रिकेट स्पर्धेत साखळी सामन्यात मुदलियार आणि सातोस्कर संघांनी शानदार विजय मिळवले.
जुळे सोलापूर येथील भंडारी क्लबच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात मुदलियार संघाने चंदू खाडिलकर संघाचा ८ गडी राखून पराभव केला, तर दुपारच्या सामन्यात सातोस्कर संघाने चंदू पवार संघावर ४४ धावांनी मात केली.
पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चंदू खाडिलकर संघाला मुदलियारच्या भेदक गोलंदाजीसमोर मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांचा संपूर्ण संघ १६.४ षटकांत ९ बाद ७७ धावांवर मर्यादित राहिला. यात मुदलियार संघाकडून सुजल भांडेकरने ३ षटकांत १० धावा देत ३ बळी घेतले, तर गणेश वेर्नेकरने २ तर मानस जैस्वालने १ बळी टिपला. ७८ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मुदलियारच्या फलंदाजांनी संयमी खेळ केला. नीलच्या नाबाद २६ धावा (२५ चेंडू, ५ चौकार), सोमेश लोखंडेच्या १२ धावा आणि साईविराजच्या १० धावांच्या जोरावर त्यांनी १२ षटकांत २ बाद ७८ धावा करून सामना सहज जिंकला. सुजल भांडेकरला ‘सामनावीर’ तर नीलला ‘सर्वोत्तम फलंदाज’ घोषित करण्यात आले.
दुपारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सातोस्कर संघाने २५.३ षटकांत ९ बाद १६६ अशी स्पर्धात्मक धावसंख्या उभारली. चंदू पवार संघाकडून गोलंदाजी करताना अवनीक एल. याने ३ षटकांत २० धावा देऊन ३ बळी घेतले. १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चंदू पवार संघाचा डाव २६.१ षटकांत १२२ धावांवर आटोपला. चंदू पवार संघाकडून सुरज मोरे यांनी ४० चेंडूंत ४ चौकारांसह सर्वाधिक नाबाद २९ धावा केल्या. सातोस्करच्या श्लोक चौगुलेने १५ धावांत ३ बळी आणि अर्जुन पाटीलने ४ धावांत २ बळी घेत चंदू पवार संघाला बॅकफूटवर ढकलले. सातोस्करच्या श्लोक चौगुलेला ‘सामनावीर’, अर्जुन पाटीलला ‘सर्वोत्तम गोलंदाज’, सुरज मोरे यांना ‘सर्वोत्तम फलंदाज’ आणि अवनीक एल. यांना ‘फायटर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
——





















