सोलापूर : पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व प्रमुख नाल्यांची साफसफाई, अतिक्रमण निर्मूलन आणि आवश्यक रुंदीकरणाची कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना पाणी तुंबण्याच्या समस्येपासून दिलासा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिला आहे.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई, रुंदीकरण आणि पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा याकडे महापालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी लक्ष घातले आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोमवारी नीलम नगर परिसरातील १२ नंबर नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. पाहणीवेळी नगर अभियंता सारिका आकुलवार, सहाय्यक नगर अभियंता प्रकाश दिवाणजी, कनिष्ठ अभियंता मनोज जाधव, नगरसेविका कलावती गदगे, कविता गज्जम, बसवराज केन्नाळकर, विभागीय कार्यालय क्र. ४ चे अधीक्षक नंदकुमार गजधनी, कनिष्ठ अभियंता सूफियान पठाण, प्राजक्ता वडतिले, महेंद्र बोटे तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रभागातील नगरसेविका कलावती गदगे आणि कविता गज्जम यांनी नाल्याच्या विद्यमान आराखड्यातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. नाल्याचे नैसर्गिक वळण सध्या वाकडे-तिकडे झाल्यामुळे परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याचे सांगत नाल्याचे अलाइनमेंट तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने सरळ करण्याची गरज आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचण्याऐवजी नाल्यामार्फत सुरळीतपणे वाहून जाईल यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाहणीदरम्यान नगरसेवकांनी जाधव यांच्या जमिनीशेजारी जाणारा नाला काही ठिकाणी बंद करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना अधिकृत नकाशानुसार नाल्याची साफसफाई आणि रुंदीकरण करण्याचे निर्देश दिले.
यानंतर आयुक्तांनी सुमय्या नगर येथील जैतुनबी शाळेजवळील पावसाळी नाल्याची पाहणी केली. या ठिकाणी शाळेच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या बंदिस्त नाल्याच्या इनलेट पॉईंटवर तसेच नाल्याच्या मार्गावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले.यावेळी शाळेचे प्रतिनिधी एम. डी. शेख यांनी नाल्याचा मार्ग बदलून तो उजव्या बाजूच्या लोकवस्तीतील रस्त्यातून नेण्याची मागणी केली. मात्र सन २०११ च्या अधिकृत नकाशानुसार संबंधित नाला शाळेच्या डाव्या बाजूने आणि मागील भागातून जात असल्याचे स्पष्ट करत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नाल्याची दिशा बदलणे शक्य नसल्याचे सांगितले.
केंद्र शासनानेही याच मूळ आराखड्यानुसार नाला रुंदीकरणाला मंजुरी दिली असल्याने काम मूळ नियोजनानुसारच करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगर अभियंता सारिका आकुलवार यांनीही संबंधित शाळेकडून नाल्याच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे सांगत नाला मूळ आराखड्यानुसार शाळेच्या डाव्या बाजूनेच जात असल्याचे नमूद केले. त्यावर आयुक्तांनी शाळा प्रशासनास अतिक्रमण हटवून नाल्याच्या बांधकाम आणि साफसफाईच्या कामात महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शाळेच्या सुरक्षिततेचा विचार करून इतर ठिकाणी खुला नाला असला तरी शाळेसमोरील भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदिस्त नाल्याची रचना करण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण
उपलब्ध करून देण्याचे आदेश
कामात अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले. यासंदर्भात कंत्राटदाराकडून आवश्यक माहिती घेऊन नगर अभियंत्यांना तत्काळ कळविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
Post Views: 5