पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने आयोजित श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवात दि. १६ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताने तसेच भावपूर्ण अभंगगायनाने पंढरपूरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सन्माननीय सदस्य, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव आणि व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या संगीत महोत्सवातील दुसरे गायन पुष्प पं. जयतीर्थ मेऊंडी यांनी गुंफले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्या तथा पंढरपूर नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम व मान्यवर कलाकारांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पं. जयतीर्थ मेऊंडी यांनी रूपक तालातील गणपती स्तुतीने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यानंतर वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र असलेल्या ‘जय जय राम कृष्ण हरी’, ‘विठ्ठल विसावा’, ‘बाजे रे मुरलिया बाजे’, ‘तुज सगुण म्हणो की निर्गुण रे’, ‘आता कोठे धावे मन’, ‘आकार उकार मकार’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ आदी रचना भावपूर्ण शैलीत सादर करून आपली गायनसेवा विठुरायाच्या चरणी अर्पण केली.
या मैफिलीला तबला – ऋषिकेश जगताप, हार्मोनियम – माधव लिमये, पखवाज – ज्ञानेश्वर दुधाणे, टाळ – माऊली पिसे तसेच स्वरसाथ – यतीन यांनी सुरेल साथसंगत केली. कलाकारांच्या अप्रतिम सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरस आणि संगीताच्या स्वरांनी भारावून गेले.
संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पंढरपूरातील कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अविस्मरणीय संगीत मैफिलीचा मनमुराद आनंद घेतला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने पंढरपूरचा समृद्ध सांस्कृतिक व भक्तिसंगीताचा वारसा जपण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या २०, २१, २२ व २३ सप्टेंबर रोजीही नामवंत व ख्यातनाम गायक-गायिकांची गायनसेवा विठुरायाच्या चरणी समर्पित होणार आहे. या संगीत मैफिलींचा आनंद घेण्यासाठी सर्व कलारसिक व संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 14