पुणे-मुंबईसह सोलापूरमधील ३३ उद्योजकांनी उद्योग सुरू करण्यासाठी सोलापूरमधील एमआयडीसींमध्ये जागेची मागणी केली आहे. परंतु, अजूनही त्यांना जागा मिळालेली नाही. नवीन जमिनींच्या भूसंपादनाचा विषय प्रलंबित असून दुसरीकडे अनेकांनी नुसत्या जागा घेऊन ठेवल्या पण उद्योग सुरू केलेले नाहीत, अशीही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दीडशेहून अधिक उद्योजकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
राज्यातील अनेक मोठमोठे उद्योग परराज्यात गेले असून अजूनही अनेकजण त्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. उद्योजकांसाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा असलेल्या ठिकाणी त्यांना पुरेशा प्रमाणात जमीन मिळत नाही, याशिवाय टॅक्स व अन्य अडचणी त्यासाठी कारणीभूत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक तरुणांना जिल्ह्यातील विविध एमआयडीसींमध्ये नोकरी तथा रोजगार मिळेल, अशी स्थिती आहे. पण, त्यासाठी चिंचोळी (ता. मोहोळ), कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर), मोडनिंब (ता. माढा), कासेगाव (ता. पंढरपूर), गौडगाव टप्पा दोन (ता. बार्शी) व गारवाड (ता. माळशिरस) येथील एमआयडीसींमध्ये आठ हजार एकर (३२०० हेक्टर) जमीन आवश्यक आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभागाला त्यासंबंधीचे प्रस्ताव गेले आहेत, पण अजूनही त्या जमिनीचे संपादन सुरू झालेले नाही. आगामी काळात त्यावर निर्णय न झाल्यास हे उद्योजक दुसरीकडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.