मोहोळ – तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगरच्या वतीने यंदाच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला तीन प्रकारचा दर देण्यात येणार आहे. 31 जानेवारी अखेर पर्यंत येणाऱ्या उसाला 2800, फेब्रुवारी मध्ये 2900 आणि मार्च महिन्यात गाळपास येणाऱ्या उसाला 3 हजार रुपये दर देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना जाधव यांनी सांगितले: जकराया शुगरकडे गाळपास येणाऱ्या उसाला जिह्यात सर्वोच्च दर देण्याची परंपरा निर्माण केली आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविलेला कारखाना म्हणून या कारखान्याच्या देशभरात नावलौकिक केवळ शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या जोरावर झाला आहे.त्यामुळे या कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राध्यान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कारखाना व्यवस्थापनाने यंदाच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला तीन प्रकारचा दर देण्याचा निर्णय घेतला आहे.
जानेवारी महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच्या पिकासाठी पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे शेतकरी आपला ऊस लवकरात लवकर गाळपास कसा जाईल यासाठी धडपड करतो. मात्र जानेवारी महिन्यांपासून पुढे गाळपास येणाऱ्या उसाला चांगला उतारा मिळतो. मात्र कारखानदार ऊस बिल ठरल्या प्रमाणे सरासरीच पहिला हप्ता देतात. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र ही गोष्ट शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. ही बाब ओळखूनच जकराया शुगरने तीन महिन्यासाठी तीन वेगवेगळी बिले देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जानेवारी अखेरच्या उसाला 2800, फेब्रुवारी मध्ये 2900 आणि मार्च महिन्यात गाळपास येणाऱ्या उसाला तीन हजार रुपये दर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सलग दोन वर्षे झालेल्या चांगल्या पावसामुळे उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ नोंदविली गेली आहे. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम मागील दोन वर्षाच्या तुलनेत मार्च अखेर पर्यंत चालण्याची शक्यता आहे. जकराया शुगरने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला असल्याने कोणत्याही शेतकऱ्याने गडबड न करता आपला या कारखान्यालाच द्यावा.
उत्कृष्ट यंत्रणा आणि काटेकोर तोडणी कार्यक्रम राबवून कारखान्याने गेल्या 41 दिवसात 1 लाख 75 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यंदाच्या हंगामात कारखान्याने गाळप क्षमता वाढवून ती प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन केली आहे. यावेळी कारखान्याचे पूर्ण वेळ संचालक राहुल जाधव, मुख्य शेती अधिकारी नानासाहेब बाबर, मुख्य वित्त अधिकारी अनिल पवार, केन मॅनेजर विजय महाजन,जकराया मल्टिस्टेटचे जनरल मॅनेजर बाळासाहेब जाधव, शुगर सेलचे रितेश जगताप,पर्चेस अधिकारी भाऊसाहेब घुले उपस्थित होते.


















