वेळापूर – येथील पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
वेळापूर पोलीस ठाणे गु.र. नं. 230/2025 भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(2), 318(3), 318(4) अन्वये दिनांक 07 जून 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादी राजकुमार बापू जाधव (रा. वेळापूर, ता. माळशिरस) यांना आरोपी सिताराम नारायण महांकाळ (रा. सोलापूर) याने देशी दारू दुकानाचे परवाना हस्तांतरण करून देण्याचा विश्वास संपादन केला. त्यासाठी आरोपीने फिर्यादीकडून तब्बल ३० लाख रुपये घेतले. मात्र दारू दुकानाचे हस्तांतरण न करता व पैसे परत न देता फिर्यादीची फसवणूक केल्याचे समोर आले होते.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुमारे एक वर्षापासून फरार होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि आशिष कांबळे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सोलापूर येथे नव्या पत्त्यावर राहत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले व सदर गुन्ह्यात अटक केली.
या आरोपीविरुद्ध सोलापूर शहर आयुक्तालयातील सदर बझार पोलीस ठाणे तसेच जेलरोड पोलीस ठाणे येथेही अशा प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
वेळापूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल फिर्यादी तसेच परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि आशिष कांबळे तसेच पोहेकॉ/ संदिप पाटील, पोहेकॉ/ यशवंत आनंदपुरे, पोहेकॉ/ प्रविण हिंगणगावकर, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे पोहेकॉ भोसले, पोहेकॉ गाजरे आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ मेटकरी यांनी केली.
वेळापूर पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार आरोपी अटक केली.यावेळी प्रभारी अधिकारी आशिष कांबळे, पोलीस कर्मचारी संदीप पाटील, तानाजी लिंगडे, बापूराव पवार, स्वाती लोंढे, प्रवीण हिंगणगावकर, राजेंद्र खंडागळे आदि. दिसत आहेत.

























