पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरमार्फत भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा तसेच महानैवेद्य सहभाग योजनेच्या दि. ०४ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीतील पूजांची ऑनलाइन नोंदणी दि.३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.
मंदिर समितीच्या दि. ०३ मार्च २०२४ रोजी सह-अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेतील निर्णयानुसार पूजांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर
https://www.vitthalrukminimandir.org भेट देऊन पूजेची नोंदणी करता येणार आहे.
मंदिर समितीकडून श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व महानैवेद्य सहभाग योजना टप्प्याटप्प्याने ऑनलाइन नोंदणीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सुविधेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश आणि देशातील विविध राज्यांतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या टप्प्यात दि. ०४ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवसांकरिता श्री विठ्ठल नित्यपूजा, श्री रुक्मिणी माता नित्यपूजा, पाद्यपूजा, महानैवेद्य सहभाग योजना तसेच माहे ऑगस्ट २०२६ मधील तुळशी अर्चन पूजेची ऑनलाइन नोंदणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
पूजांचे देणगी मूल्य पुढीलप्रमाणे आहे:
– श्री विठ्ठल नित्यपूजा – ₹२५,०००/-
– श्री रुक्मिणी माता नित्यपूजा – ₹११,०००/– पाद्यपूजा – ₹५,०००/-
– तुळशी अर्चन पूजा – ₹२,१००/-
– महानैवेद्य सहभाग योजना – ₹७,०००/-
ऑनलाइन नोंदणी करताना काही अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयामार्फत नोंदणीसाठी मदत व आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल. अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी भाविकांनी ०२१८६-२९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी श्री घम यांनी केले आहे.
Post Views: 21