अकलूज : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज आयोजित ‘सृजनरंग महोत्सव २०२६-२७’ अंतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान तसेच कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील तब्बल ८८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. श्री सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. त्यानंतर आज महाविद्यालय परिसरात फोटोग्राफी स्पर्धेची प्रत्यक्ष सुरुवात प्रसिद्ध फोटोग्राफर अभिषेक भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातील निसर्ग, वास्तू, विद्यार्थी जीवन तसेच विविध वैशिष्ट्यपूर्ण क्षण आपल्या छायाचित्रांमधून टिपले. मोबाईल व कॅमेऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता, निरीक्षणशक्ती आणि कलात्मक दृष्टिकोन यांचे दर्शन घडविले.
यावेळी सृजनरंग महोत्सव समन्वयक डॉ. विश्वनाथ आवड, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. चंद्रशेखर ताटे-देशमुख, हिंदी विभाग प्रमुख डॉ. निवृत्ती लोखंडे, तसेच फॅकल्टी स्पर्धा प्रमुख प्रा. विजय शिंदे, प्रा. दिपराज देशमुख, प्रा. धिरज गुरव यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ‘सृजनरंग महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. फोटोग्राफी स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेची साक्ष देणारा ठरला आहे.
Post Views: 94