बार्शी – पांढरी येथील साठवण तलावातून पांगरी ग्रामपंचायतीकडून सुरु असलेला पाणी उपसा तात्काळ बंद करावा आणि तलावातील शिल्लक पाणीसाठा पांढरी गावातील नागरिक व जनावरांसाठी राखीव ठेवावा, या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेले पांढरी ग्रामस्थांचे उपोषण आमदार राजेंद्र राऊत यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. पांगरी गावासाठी दररोज आठ तास पाणी उपसा करण्यास पांढरी ग्रामस्थांनी मंजुरी दिल्यानंतर हा तोडगा काढण्यात आला.
पांढरी तलावात सध्या केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, तलावाच्या खालील बाजूस पांढरी गावाची पाणीपुरवठा विहीर आहे. याच विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जात असल्याने तलावातील उर्वरित पाणीसाठा भविष्यातील पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित ठेवावा, अशी ग्रामस्थांची भूमिका होती. पांगरी ग्रामपंचायतीकडून तलावातील पाणी पाणीपुरवठ्यासाठी घेतले जात असल्याने ग्रामस्थांनी त्यास विरोध केला होता.
दरम्यान, मृद व जलसंधारण उपविभाग, मोहोळ यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी पांगरी ग्रामपंचायतीला पत्र देऊन पांढरी साठवण तलावातून सुरू असलेला पाणी उपसा तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले होते. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. आदेशाचे पालन न केल्यास योग्य ती कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
जलसंधारण विभागाच्या पत्रानुसार, पांगरी गावासाठी जल जीवन मिशनअंतर्गत पाथरी येथील मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे. तसेच ममदापूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्पातूनही पांगरीसाठी पाणीपुरवठ्याची व्यवस्था उपलब्ध असल्याचे नमूद आहे.
या पार्श्वभूमीवर पांढरी ग्रामस्थांनी ‘पांढरीच्या हक्काचे पाणी पांढरीसाठीच’ अशी भूमिका घेतली होती. मात्र आमदार राजेंद्र राऊत यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून पांगरीसाठी आठ तास पाणी उपसा करण्याबाबत सहमती घडवून आणली. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.