
सोलापूर : नई जिंदगी परिसरातील मौलाना चौक येथे गुरुवारी सायंकाळी जुन्या वादातून दोन गटांत भांडण झाले होते. कोयत्याने आणि लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करून तरुणाला गंभीर जखमी करणाऱ्या सैफ मुकदूम शेख (रा. नई जिंदगी सोलापूर) या आरोपीवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपीची पोलिसांनी भररस्त्यातून धिंड काढून त्याला पोलीस ठाण्यात चालत आणले.
गुरूवारी २१ मे रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास नई जिंदगी परिसरातील मौलाना चौक येथे जुन्या वादातून दोन गटांत भांडण झाले होते. या भांडणाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. आरोपी सैफ शेख आणि जैद शामू शेख (रा नई जिंदगी) यांनी फिर्यादी मुस्तफा जाकीर शेख (रा. मौलाना आझाद चौक, नई जिंदगी) यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला केला. या गंभीर हल्ल्यात फिर्यादी मुस्तफा जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना नई जिंदगी परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीची कोणतीही मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली तरी परिसरातील त्याची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी आरोपीला गाडीत न नेता, परिसरातून पायी चालवत पोलीस ठाण्यापर्यंत आणले.. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचा वचक निर्माण झाला असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
चौकट – काही दिवसापूर्वी यातील आरोपी सैफने नई जिंदगी परिसरात एका हाताने गाडी चालवत एक व्हिडीओ तयार केला. यात ”पोलिस चौकी के हिसाब से शहर बाट रहे हो सुल्तान, चौकीयॉं चाहे पुलिस की हो, शहर के कमिशनर तो हम ही लोंग है” असा चित्रपटातील डायलॉग असलेला व्हिडिओ काढून व्हायरल केला होता.कारवाई नंतर आरोपी सैफ याने पोलिसा प्रति केलेल्या वक्तव्याची माफी मागून त्याचा ही व्हिडिओ व्हायरल केला आहे.




















