सांगोला – अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा, बेंगळूरू यांच्या वतीने सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांना नुकताच मानाचा ‘वीरशैव श्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने प्राचार्य चारूदत्त जगताप यांच्या हस्ते प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके यांच्यासह प्रशालेचे उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे उपस्थित होते. गेली ११७ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या संस्थेचा हा पुरस्कार अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत मिळाला, याचा मला मनस्वी आनंद आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्य करण्याचा घराण्याचा वसा पुढे चालवण्याची मला संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. काम हे पुरस्कार मोजण्यासाठी नसते, तर ते सातत्याने करत राहायचे असते. केवळ पुरस्कारासाठी काम करू नये, तर निष्काम भावनेने केलेल्या कामामधून जे आत्मिक समाधान मिळते, तोच माणसाचा खरा आणि सर्वोच्च पुरस्कार असतो. आजवर केलेले विविध क्षेत्रांतील कार्य लक्षात घेऊन मला हा पुरस्कार मिळाला असला तरी, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून तो आपल्या सर्वांचा आहे. मी केवळ आपला एक प्रतिनिधी म्हणून तो स्वीकारला आहे, असे मनोगत प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले. प्रा.शिवशंकर तटाळे यांनी आभार मानले.
Post Views: 29