अक्कलकोट – सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त गुरुवारी ग्रामीण रुग्णालय, अक्कलकोट येथे जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन अक्कलकोट नगरपरिषदेचे आरोग्य सभापती अविनाश मडिखांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंध आणि तणावमुक्त जीवनशैली याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालय अक्कलकोटचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, डॉ. रवींद्र बनसोडे, डॉ. शिवा हताळे, सोलापूर जिल्हा रुग्णालयाच्या CS ऑफिस टीममधील सुप्रिया शिवशरण, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ श्री. अक्षय गुंजाळ, समाजसेवक श्री. अतुल राऊत, समुपदेशक, तसेच अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी श्रीमती शीतल जाधव, NCD स्टाफ उज्वला फडतरे, ICTC टेक्निशियन श्री. राघवेंद्र करजगीकर, आयुष विभागाचे डॉ. बिराजदार यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आरोग्य सभापती अविनाश मडिखांबे म्हणाले की सध्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची काळाची जबाबदारी असल्याचे सांगितले. योग्य आहार, mनियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती,मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळणे, कुटुंबामध्ये सुसंवाद ठेवणे, व्यसनांपासून दूर राहणे, ध्यानधारणा करणे तसेच मनावर नियंत्रण ठेवून शांतता व संयम राखणे याबाबत त्यांनी विविध उदाहरणांसह मार्गदर्शन केले.
“मनातील ताण आणि अडचणी एकट्याने सहन न करता आपल्या कुटुंबाला तसेच मित्रपरिवार किंवा तज्ज्ञांशी संवाद साधणे आवश्यक आहे. योग्य वेळी मिळालेली साथ आणि समुपदेशन एखाद्याचे जीवन वाचवू शकते,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनीही मानसिक आरोग्याचे महत्त्व, तणाव व्यवस्थापन आणि आत्महत्या प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी तसेच रुग्णांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राघवेंद्र करजगीकर यांनी केले आभार अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी शितल जाधव यांनी मानले.
Post Views: 18