सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून सामूहिकरीत्या संविधान प्रास्ताविका वाचन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण करत त्यांचे आदर्श आचरणात आणण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा प्रांजली मोहीकर होत्या. त्या म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ वाचनापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत आणणे ही काळाची गरज आहे. भारतीय संविधान हे देशासाठी आदर्श मार्गदर्शक असून त्याचे महत्त्व प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे.
यावेळी संस्थेच्या विश्वस्त ज्योती मेने यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांवर प्रकाश टाकला. सुहास भोसले यांनी बाबासाहेबांचे विचार मांडले. तसेच विश्वस्त शैलेश मोहीकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात “हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे” हे प्रेरणादायी गीत सादर केले.या कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रेमचंद मेने, विश्वस्त ज्योती मेने, शैलेश मोहीकर तसेच सन्माननीय सदस्य प्रकाश शिंपी, सुहास भोसले, राजू निकंबे, भारती ढोबळे, साक्षी ढोबळे, संगीता महिंद्रकर, अनुराधा निकम, वैशाली गायकवाड, पुष्पलता गायकवाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























