सोलापूर – अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या अधिपत्याखालील शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील रिक्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक/शिक्षक पदे पवित्र (Pavitra) प्रणालीद्वारे १०० टक्के भरण्यात येणार आहेत. यासाठी पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, पदांसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या भरती प्रक्रियेत एकूण ६१३ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षक (मराठी व इंग्रजी माध्यम), माध्यमिक शिक्षक (मराठी व इंग्रजी माध्यम) तसेच उच्च माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) या पदांचा समावेश आहे. मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आदी विषयांसाठी पदे उपलब्ध आहेत.
उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर लॉगिन करून पदनिहाय प्राधान्यक्रम तयार करावेत. त्यासाठी ६ ऑगस्ट २०२६ ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पसंतीक्रम नोंदवून तो निश्चित (Lock) करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीत प्राधान्यक्रम निश्चित न केल्यास संबंधित उमेदवाराचा विचार होणार नाही.
उमेदवारांच्या प्राधान्यक्रमाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीशिवाय भरण्यात येणाऱ्या पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
भरती प्रक्रियेसंदर्भातील अडचणी, सूचना किंवा मागण्या उमेदवारांनी edupavitra25@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

















