स्वातंत्र्यसेनानी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या वासाळी (ता. इगतपुरी) येथील स्मारकाच्या उभारणीसाठी ४८३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर कळसूबाई शिखरावर रोप वे उभारण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. आज (दि. ३०) यासंदर्भात स्मारक समितीची बैठक पार पडणार आहे.
सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या कामास गती मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार बैठक होऊन वरील विषयांना मान्यता देण्यात आली. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, दिलीप वळसे-पाटील, आमदार माणिकराव कोकाटे, नितीन पवार, नितीन भुसारा, वित्त विभागाचे सचिव, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, वास्तुविशारद देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.