सोलापूर – जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या विशेष शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याशिवाय सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतरचा फरकही तब्बल तीन ते साडेतीन वर्षांपासून प्रलंबित असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नियमित वेतन न मिळाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन गरजा भागवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच आर्थिक असुरक्षिततेला सामोरे जावे लागत असल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षक व शिक्षकेतर थकीत वेतन तात्काळ अदा करावे, सातवा वेतन आयोगाचा फरक मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच यापुढे वेतन वेळेत मिळण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशी मागणी त्या शिक्षकांनी केली आहे.
दरम्यान, शासनाकडून आवश्यक निधी वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रशासनाने याबाबत तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.