अकलूज – रोटरी क्लब अकलूजच्या रोटरी वर्ष २०२६-२७ चा पदग्रहण सोहळा दि.७ ऑगस्ट २०२६ रोजी स्मृतीभवन शंकरनगर- अकलूज येथे दिमाखात संपन्न झाला.
रोटरीचे मावळते अध्यक्ष रो.केतन बोरावके व सचिव रो. अजिंक्य जाधव यांनी प्रमुख अतिथी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे २०२७-२८ नियुक्त प्रांतपाल रो. क्षितिज झावरे व २०२६-२७ चे सहाय्यक प्रांतपाल रो.डॉ. साजिकराव पाटील यांच्या उपस्थितीत नूतन अध्यक्ष रो.डॉ. मनिष गायकवाड व सचिव रो. अभिषेक टेके यांच्याकडे पदभार सोपविला.यावेळी रो.क्षितिज झावरे यांची ओळख रोटरी डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डायरेक्टर रो. सीए नितीन कुदळे यांनी केली तर प्रमुख अतिथी यांनी रोटरीचे सामाजिक कार्य,विविध सेवा प्रकल्प आणि समाजासाठी रोटरीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.नूतन अध्यक्ष रो.डॉ.मनिष गायकवाड यांनी आगामी वर्षातील विविध आरोग्य,शिक्षण, पर्यावरण व सामाजिक सेवा प्रकल्पांची रूपरेषा मांडत रोटरीचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला.यावेळी नूतन संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले कवयित्री सौ. गुंजन पाटील यांचे खुमासदार कविता सादरीकरण.आपल्या विनोदी तसेच विचार करायला भाग पाडणाऱ्या कवितांनी त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमास विविध संस्था- संघटनांचे पदाधिकारी,पत्रकार बांधव व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते