पंढरपूर – भीमा नदीकाठावरील परिसरात सुरू असलेल्या राजरोस वाळू चोरीमुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, या प्रकाराला प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध आणि अभय असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी केला आहे.
कारण रविवारी रात्री (आंबे,ता.पंढरपूर ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांच्याच शेतामध्ये ऊसात चोरीच्या वाळूने भरलेला टिपर पलटी झाला आहे. त्यामुळे ऊसाचे आणि नारळाच्या झाडांचे नुकसान झाल्याची माहिती स्वत: स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनीच दिली आहे.
या प्रकारा बाबत पाटील यांनी सांगितले की, वाळूची अवैध वाहतूक करणारे टिपर दिवस-रात्र बेफाम वेगाने शेतरस्त्यांवरून धावत असल्याने शेताकडे जाणारे रस्ते धोकादायक झाले आहेत. शेतकरी, महिला, शाळेत जाणारी लहान मुले-मुली तसेच शेतातील वस्तीवरील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. धूळ, आवाज आणि सततची अवजड वाहतूक यामुळे नदीकाठावरील गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “एवढ्या राजरोसपणे भीमा नदीकाठावरील वाळू चोरी नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? कोणते अधिकारी वाळू माफियांच्या पाठीशी उभे आहेत?” या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्यांचे आर्थिक हितसंबंध उघड होतील अशा संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी देखील पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासन आणि जिल्हा प्रशासनाला इशारा दिला आहे की, वाळू चोरी तात्काळ बंद करून दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर नदीकाठावरील शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. प्रशासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी केली आहे.
———————-
चौकट : ( आवाज उठविणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न )
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी असा आरोपही केला आहे की, वाळू चोरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी केली जाते, तसेच त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारामुळे सामान्य शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Views: 64