वैराग – सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘जिल्हास्तरीय गणराया अवॉर्ड २०२६’ अंतर्गत कुर्डूवाडी येथील शनिराज गणेश मित्र मंडळाचा गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी दिलेल्या “No DJ, No Dolby, No Laser Light” या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाने सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवले.
दिनांक ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील संवाद हॉलमध्ये पार पडलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या शुभहस्ते मंडळाचे अध्यक्ष प्रतीक शेंबडे व पदाधिकारी यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
ध्वनिप्रदूषण टाळून सामाजिक भान जपल्याबद्दल मंडळाचे विशेष कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमास कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.