पंढरपूर – हिंदुत्व आणि देशप्रेम वाढीस लागावे या एकमेव उद्देशाने प्रेरित होऊन सर्व संपत्ती, पैसा याचा त्याग करून वानप्रस्थाश्रम स्वीकारणाऱ्या मुळच्या कोल्हापूर येथील शर्मिला श्रीपाद पागे आजीं आषाढी यात्रे पासून पंढरपूर येथे वास्तव्य करीत आहेत. कार्तिकी यात्रा आणि चार्तुमासाच्या समाप्ती नंतर पुढच्या प्रवासासाठी पागेआजी मार्गस्थ होणार आहेत. एकंदरीतच सर्व भौतिक सुखांचा त्याग करून केवळ हिंदूत्व आणि धर्मरक्षणासाठी जीवन जगणाऱ्या शर्मिला पागेआजींचे उदाहरण हे आजच्या स्वार्थी आणि संकुचित वृत्तीच्या जगात वावरणाऱ्या आपमतलबी तसेच भ्रष्टाचारी लोकांच्या डोळ्यात खरोखरच अंजन घालणारे असेच आहे.
शर्मिला पागेआजी आषाढी वारी पासून पंढरपूर येथे वास्तव्यास आहेत, हिंदुत्व आणि देशप्रेम वाढावे यासाठी २००७ साली त्यांनी व त्यांचे पती श्रीपाद पागे यांनी आपले घरदार सोडले. विशेष म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये त्यांना उत्तम पगाराची नोकरी होती. पुणे येथे दोन मुले, सुना, नातवंडे असा सुख समृध्दीने भरलेला परिवार असूनही भौतिक सुखांचा त्याग करत त्या देशभर पायी भ्रमंती करीत असतात.
पंढरपूर येथे पाच, सात घरात मधोकरी मागून पूर्ण वेळ त्या नामस्मरणात घालवितात. सर्वात कठीण अशी नर्मदा परिक्रमा त्यांनी दोन वेळा केली आहे. एक काठी, अंथरूण, व कपड्याची पिशवी एवढीच त्यांची संपत्ती आज त्यांच्या सोबत आहे. पंढरीत संपूर्ण चातुर्मास करून त्या पुन्हा नर्मदा किनारी जाणार आहेत. शर्मिला पागेआजी या गोंदवलेकर महाराजांच्या अनुयायी असून श्री दत्त संप्रदाय व हिंदुत्वाच्या विचाराचा प्रसार करतात.
२०२० साली कोरोना या जीवघेण्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही आपले व्रत पागे आजींनी चालूच ठेवले. देशभरातील अनेक धार्मिक व अध्यात्मिक ठिकाणी भेट दिली. पती श्रीपाद पागे यांचे आकस्मिक निधन झाले तरीही त्या मागे हटल्या आपल्या ध्येया पासून थोड्याही विचलित झाल्या नाहीत. पतीला खांदा देऊन त्यांनी पतीच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला होता. तरीपण त्या स्वतःला साधारण स्त्री आहोत असेच आजी मानतात.
——————
मोदीं आणि योगींना भेटण्याची तीव्र इच्छा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्याची त्यांची इच्छा आहे. नरेंद्र मोदी यांच्या मुळे देशात चांगले दिवस आले असून हिंदुत्व टिकून आहे असे त्या मानतात.
——————
आत्तापर्यंत अनेक तिर्थक्षेत्रांना भेटी
सर्वप्रथम कोल्हापूर, पैजारवाडी, वैभववाडी, गगनबावडा,गोवा, कारवार, कर्नाटक, शृंगेरी मठ, केरळ, तामिळनाडू येथील तीर्थक्षेत्रां बरोबरच अयोध्या, वृंदावन, मथुरा, नैमिष्यराण्य काशी या क्षेत्रांना देखील आत्तापर्यंत त्यांनी भेटी दिल्या आहेत. या भेटी दरम्यान त्यांनी आश्रम, धर्मशाळा किंवा कुणाच्यातरी घरात मुक्काम केला. नर्मदा परिक्रमा करीत असताना कोठेही चिरंजीव असणारा अश्वत्थामा किंवा हनुमान भेटत नाही या सर्व अफवा असतात असेही पागेआजी सांगतात.
—————–
नर्मदा किनारी पतीने सोडले प्राण
२०२० मध्ये नर्मदा परिक्रमा करीत असताना त्यांचे पती श्रीपाद पागे यांनी स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. त्यांना मृत्यू दिसत होता. नर्मदा किनारी कोटेश्वर मंदिरात त्यांनी प्राण सोडले. पण पतीच्या सांगण्यानुसार मंगळसूत्र, कुंकू पुसले नाही, माझा मृत्यू झाला तरीही रडू नकोस, आपले व्रत सुरू ठेव असे पतीने त्यांना निधनापूर्वी सांगितल्याचे त्या आवर्जून सांगतात.
——————
मुलांवर चांगले संस्कार करा
विशेष म्हणजे पागेआजी या कोणतीही सिरीयल किंवा टीव्ही पाहत नाहीत. त्या केवळ साधा मोबाईल वापरतात. स्त्रियांनी एकमेकांचा आदर करावा निंदा नालस्ती करू नये. आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवावेत. मोबाईल गेम्स या पासून मुलांना दूर ठेवावे. शुभंकरोती,रामरक्षा, श्री मारुती स्तोत्र दररोज सकाळ, संध्याकाळी आपल्या मुलांकडून म्हणून घ्यावेत असा सल्ला देखील महिलांना आवर्जून त्या देतात.




















