पंढरपूर : गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस आकर्षक, मनोहारी व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. या पारंपरिक अलंकारांमुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप अधिक विलोभनीय दिसून आले.
श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभमणी, दंडपेठ्या जोड, मोठ्या हिऱ्याचे कंगन जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी एकपदरी, लहान व मोठे शिरपेच, तोडे जोड, मोहरांची माळ, तुळशीची माळ तीनपदरी, सोन्याचे पैंजण जोड, अष्टपैलू मण्याची कंठी आठपदरी, अष्टपैलू मण्याची कंठी तीनपदरी, पुतळ्यांची माळ, लक्ष्मीहार व मत्स्य जोड आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.
तसेच, श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, ताणवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी व कंबरपट्टा आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली
गौर पर्वानिमित्त करण्यात आलेल्या या विशेष अलंकार परिधानामुळे मंदिरातील धार्मिक व पारंपरिक वातावरण अधिक भक्तिमय झाले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे हे मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकां मध्ये विशेष उत्साह दिसून आला.
Post Views: 9