सोलापूर : शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाची हिप्परगा तलाव ते भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र या मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्तीची कामे बुधवार, दि. 10 जून रोजी हाती घेण्यात येणार असल्याने संबंधित भागातील पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने हिप्परगा तलावापासून भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या मुख्य पाईपलाईनची दुरुस्ती, नवीन व्हॉल्व बसविणे तसेच विविध जोडणीची कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी बुधवारी सकाळपासून शटडाऊन घेण्यात येणार असून कामांचा कालावधी मोठा असल्याने भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या परिसरांना त्याचा परिणाम जाणवणार आहे.
यामुळे भवानी पेठ दयानंद टाकी, कस्तुरबा टाकी, दहिटणे-शेळगी, विडी घरकुल तसेच हायलेव्हन जलवाहिनीमार्फत होणारा पाणीपुरवठा बुधवार, दि. 10 जूनपासून एक वेळ, एक रोटेशन म्हणजेच एक दिवस पुढे दिला जाणार आहे. दरम्यान, दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी दैनंदिन पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे यांनी केले आहे.
Post Views: 19