सोलापूर : सोलापूर शहरातील नागरिकांना सातत्यपूर्ण, सुरक्षित, विश्वासार्ह आणि शाश्वत 24×7 पाणीपुरवठा सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आणि जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय एकदिवसीय कार्यशाळा झाली. यामध्ये विविध मुद्द्यांवर सखोल मंथन करण्यात आले.
कार्यशाळेस जागतिक बँकेकडून डॉ. आलोक सुमन, श्रीनिवास राव, जोर्ग, कॅमेन यी, रोझ डोमिंगोस, गुस्तावो, मूर्ती आणि सुमन तर महानगरपालिकेकडून महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजप सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, अभियंता उमर बागबान व इतर अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत सोलापूर शहराच्या विद्यमान पाणीपुरवठा व्यवस्थेतील आव्हाने, शहराची वाढती लोकसंख्या व भविष्यातील पाण्याची मागणी, उपलब्ध जलस्रोतांची दीर्घकालीन सुरक्षितता आणि सध्याच्या ठरावीक वेळेच्या पाणीपुरवठ्यातून निरंतर 24×7 पाणीपुरवठ्याकडे संक्रमण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शहराच्या अंतर्गत पाणीपुरवठा सुधारणा प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये शहराची विद्यमान व भविष्यातील पाण्याची मागणी, शहरवाढीचे कल, अस्तित्वातील पाणीपुरवठा पायाभूत सुविधांची स्थिती, आवश्यक बळकटीकरण, बल्क वॉटर आणि वितरण प्रणालीतील प्रस्तावित सुधारणा, भांडवली गुंतवणूक, प्रकल्प अंमलबजावणीचे टप्पे आणि नागरिकांना मिळणाऱ्या अपेक्षित सेवा सुधारणांचा आढावा घेण्यात आला.
पाणीगळती व एनआरडब्ल्यू कमी करण्याला प्राधान्य
24×7 पाणीपुरवठा यशस्वी करण्यासाठी नॉन रेवेन्यू वॉटर (एनआरडब्ल्यू) कमी करणे, पाणीगळतीवर नियंत्रण, मागणी व्यवस्थापन आणि वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढविणे या बाबींना प्राधान्य देण्याचे अधोरेखित करण्यात आले.
शहरात डिस्ट्रिक्ट मीटर्ड एरियाज विकसित करून प्रत्येक भागातील पाण्याचा प्रवाह व दाब यांचे नियमित निरीक्षण करणे, पाणीगळती ओळखणे आणि टप्प्याटप्प्याने 24×7 पाणीपुरवठा क्षेत्र विकसित करण्याच्या कार्यपद्धतीवर चर्चा करण्यात आली.
प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डिझाईन बिल्ड ऑपरेट (डीबीओ) या दीर्घकालीन करार पद्धतीवर सखोल चर्चा झाली.
दर्जेदार पाणीपुरवठा करण्यास प्राधान्य : आयुक्त डॉ. ओम्बासे
महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी याबाबत सांगितले की, सोलापूर शहराची भविष्यातील वाढ लक्षात घेऊन पाणीपुरवठा व्यवस्थेचे सर्वंकष आधुनिकीकरण आवश्यक असल्याचे नमूद केले. जलस्रोतापासून ते नागरिकांच्या नळजोडणीपर्यंत संपूर्ण पाणीपुरवठा साखळी अधिक सक्षम, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने महानगरपालिका प्रयत्नशील आहे. नागरिकांना पुरेशा दाबाने, सुरक्षित आणि विश्वासार्ह पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे तसेच पाणीगळती कमी करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रत्येक घराला मीटरयुक्त नळजोडणी; स्काडाद्वारे आधुनिक नियंत्रण
प्रकल्पांतर्गत शहरातील पात्र घरांना मीटरयुक्त नळजोडणी देणे, पाणीपुरवठा व्यवस्थेचे स्काडा आधारित रिअल-टाइम मॉनिटरिंग, प्रतिबंधात्मक व दुरुस्ती देखभाल, प्रभावी बिलिंग व महसूल व्यवस्थापन तसेच उत्तरदायित्वाची यंत्रणा सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या सुविधेसाठी कस्टमर सर्व्हिस सेंटर्स आणि प्रभावी ग्रीइव्हांस रिड्रेसल मेकॅनिझम उभारून पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यावरही भर देण्यात आला.
Post Views: 10