सोलापूर – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या वयोगटानुसार संभाव्य महाराष्ट्र संघात सोलापूरच्या यश बोरामणी व समर्थ दोरनाल यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्थान मिळवले आहे. यश याची २३ वर्षाखालील संभाव्य संघात, तर समर्थची १९ वर्षाखालील संभाव्य संघात निवड झाली आहे.
यश याने यापूर्वी U-14 व U-16 मध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले आहे. २०२२ मधील U-19 ‘कूच बिहार’ व ‘विनू मांकड’ ट्रफीमध्ये त्याने २ शतके आणि २१ विकेट्स घेतल्या होत्या. अलीकडील ओपन इनव्हिटेशन टूर्नामेंटमध्ये ४८७ धावा (२ शतके, २ अर्धशतके) आणि १२ विकेट्स अशी कामगिरी केली असून, सध्या तो सोलापूर वरिष्ठ संघाचे नेतृत्व करत आहे.

दुसऱ्या बाजूला, समर्थने विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये अष्टपैलू खेळ करत आपले स्थान निश्चित केले आहे. २०२५-२६ च्या १९ वर्षाखालील आमंत्रितांच्या स्पर्धेत त्याने ८ डावांत २६० धावा आणि २८ बळी टिपले. तसेच २०२४-२५ च्या खुल्या वर्गातील स्पर्धेत १०९ धावा व ७ बळी, तर २०२३ च्या १६ वर्षाखालील स्पर्धेत २०९ धावा व २१ बळी अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या दोन्ही खेळाडूंचे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष दिलीप माने, सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील व चंद्रकांत रेम्बर्सो यांनी अभिनंदन केले.



















