सोलापूर – सीना भीमा खोर्यातील मध्यवर्ती ठिकाण व सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मंद्रूप येथे अत्याधुनिक व सुसज्ज बस स्थानक उभारण्यासाठी आमदार देशमुख पाठपुरावा करीत आहेत. सोलापूर विभागातून नवीन बस स्थानकाचा प्रस्ताव परीवहन महाव्यवस्थापकाकडे गेला असून लवकरच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर नवीन बसस्थानक होणार असल्याची माहिती भाजपा संघटन सरचिटणीस गौरीशंकर मेंडगुदले यांनी दिली.
आ
मदार सुभाष देशमुख यांच्या कार्यालयात परीवहन विभागाचे उपअभियंता तुषार चौधरी व
विभागीय व्यवस्थापक अमोल गोंजारी यांच्याबरोबर मंद्रूप बसस्थानकासंदर्भात बैठक झाली. यावेळी मेंडगुदले यांनी नवीन बसस्थानकासाठी ग्रामपंचायतकडून ठराव व जागेचा उतारा देण्यात आले असून प्रस्ताव मंजूरीबाबत विचारणा केली. त्यावेळी परीवहन अधिकार्यांनी मंद्रूप बसस्थानकाचा प्रस्ताव महा व्यवस्थापकाकडे पाठविण्यात आले असून परीवहन मंत्र्यांच्या मंजूरीनंतर बसस्थानक सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे लवकरच मंद्रूपमध्ये बसस्थानक सुरू होणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.
….
गावतलावाजवळ होणार बसस्थानक
….
मंद्रूप गावतलावाजवळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे दीड एकर जागा आहे. नवीन बसस्थानकासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव देण्यात आल्याने गावतलावाच्या संजयनगरजवळ नवीन बसस्थानक होणार आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांसाठी सोयीची जागा होणार आहे.
….
प्रवाशांच्या सोईसाठी ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा
…
मंद्रूपमधील प्रवाशांची गैरसोय दूर व्हावे व सुसज्ज बसस्थानक उभारणीसाठी मंद्रूप ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा सुरू आहे.
नवीन बसस्थानकासाठी ग्रामपंचायतीने गावतलावा नजीक दीड एकर जागा दिली आहे. शासनाकडून प्रस्ताव मंजूर झाल्यास नवीन बसस्थानकासाठी ग्रामपंचायतीकडून सहकार्य करण्यात येईल.
अप्पाराव कोरे, पॅनलप्रमुख, मंद्रूप ग्रामपंचायत
…


























