बार्शी – एमआयटी शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि संघभावना रुजविणाऱ्या या सोहळ्याला बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यानंतर शाळेचे मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी अमित नरवडे, मुख्य विद्यार्थिनी प्रतिनिधी जान्हवी राऊत, क्रीडा प्रमुख स्वराज माने तसेच प्रज्ञा, विपुला, दक्षा आणि प्रेरणा या गटांचे विद्यार्थी प्रतिनिधी यांना पदचिन्हे आणि सॅश प्रदान करुन नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली.
मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी सर्व विद्यार्थी प्रतिनिधींना शपथ देत शाळेच्या मूल्यांप्रती निष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण हितासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध मार्चपास्टने उपस्थितांची दाद मिळवली, तर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी “नेतृत्व” या संकल्पनेवर आधारित सादर केलेल्या आकर्षक नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत आणली.
प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक महेश माने यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात संघभावना, शिस्त, सामाजिक उत्तरदायित्व आणि प्रभावी नेतृत्व ही यशस्वी आयुष्याची मूलभूत तत्त्वे असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना कर्तव्यनिष्ठ व संवेदनशील नागरिक बनण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी विद्यार्थी परिषद ही केवळ पदांची जबाबदारी नसून शाळेच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आदर्श आचरण, सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि सकारात्मक नेतृत्वाच्या माध्यमातून इतरांसाठी प्रेरणास्थान बनावे, असे त्यांनी आवाहन केले. या सोहळ्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये नेतृत्वाची जाणीव अधिक दृढ झाली असून नव्या शैक्षणिक वर्षाची प्रेरणादायी सुरुवात झाली.
Post Views: 17