दहावीचा निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवसांपासून (ता. २८) इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात होईल. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले असून तिसऱ्या फेरीनंतर विशेष प्रवेश फेरी होईल आणि १५ जुलैपासून अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू होतील, असे त्यांनी सर्व प्राचार्यांना कळविले आहे. अकरावी प्रवेशाच्या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व महाविद्यालयांकडून शाखानिहाय प्रवेश क्षमतेची माहिती मागविली आहे.
जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालये तथा कनिष्ठ महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ‘यु-डायस प्लस’मधील माहिती ३० सप्टेंबरपर्यंत अद्ययावत करून घ्यावे. मंजूर प्रवेश क्षमता, प्रवेशित विद्यार्थी, ‘सरल’वरील विद्यार्थ्यांची माहिती विचारात घेऊनच राज्य मंडळ इयत्ता बारावीच्या परीक्षेचे अर्ज स्वीकारणार आहे. या सूचनांप्रमाणे कार्यवाही न करणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई होईल, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिला आहे. दरम्यान, दरवर्षी इयत्ता बारावीतील विद्यार्थी विविध कारणास्तव महाविद्यालय बदलून देण्याची मागणी करतात. पण, आता कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेत व जागा उपलब्धतेनुसार बारावीत महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही महाविद्यालय स्तरावरूनच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रवेश अर्ज विक्री व अर्ज स्वीकृती २८ मे ते ८ जून प्रवेश अर्जांची छाननी १० ते १५ जूनपर्यंत पहिली गुणवत्ता यादी १८ जून प्रथम गुणवत्ता यादीनुसार प्रवेश १८ ते २५ जूनपर्यंत दुसरी गुणवत्ता यादी २७ जून (२७ जून ते ४ जुलैपर्यंत प्रवेश) तिसरी गुणवत्ता यादी ५ जुलै (५ ते ८ जुलैपर्यंत प्रवेश) विशेष फेरी (एटीकेटीसह) ९ ते १२ जुलैपर्यंत असणार आहे. जिल्ह्यातील काही खासगी क्लास चालक तथा संस्था चालक हे विद्यार्थी व पालकांना विविध प्रलोभने दाखवून इयत्ता अकरावीसाठी प्रवेश निश्चित करीत आहेत. पण, विद्यार्थी व पालकांनी शाळेत प्रवेश निश्चित करण्यापूर्वी त्या शाळेची मान्यता, शैक्षणिक व भौतिक सुविधा, अध्यापक व अध्यापनाचे वर्ग, अध्यापनाचे विषय, प्रवेश क्षमता पाहावे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास जास्त झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी स्पष्ट केले आहे.